‘सलमान’चे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले, प्रशिक्षणाला जाताना झाला अपघाती मृत्यू

महालगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबादला निघालेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुचाकींवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी २१ फूट खोल पुलाखालील पाण्यात पडली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २५) सकाळी वैजापुरातील चिंचडगाव वळणावर घडली. सलमान युनूस शेख (रा, एनएमसी कॉलनी, वैजापूर ) असे त्याचे नाव असून, उराशी बाळगलेले फौजदारकीचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.

सलमान स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे फौजदार होण्याचे स्वप्न होते. बुधवारी सकाळी ७ वाजता तो पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी औरंगाबादला जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. चिंचडगाव वळणावर येताच समोर अचानक सुमारे ८ ते १० फुटांचा मातीचा ढिगारा दिसल्याने सलमानचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्या मातीच्या ढिगावर धडकून तो २० फूट खोल पुलाखाली पाण्यात पडला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सलमानला पाण्याबाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सलमानला फौजदार होऊन मोठं नाव कमवायचे होते. पण या अपघाताने त्याचे स्वप्न भंगले. सलमानच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.