लग्नाच्या वरातीत नाचताना तरुणाचा रस्त्याशेजारील विहिरीत पडून मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राच्या लग्नाच्या वरातीत बेभान होऊन नाचताना रस्त्याशेजारील विनाकठड्याच्या विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. कच्ची घाटी (ता. औरंगाबाद) येथे रविवारी (दि. 21) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

सचिन गोरखनाथ आरते (24 रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांच्या मित्राचा लग्नसमारंभ कच्ची घाटी येथे रविवारी रात्री आयोजित केला होता. लग्नाची वरात निघाल्यानंतर नवरदेवासमोर डीजेच्या तालावर सर्व जण थिरकत होते. वरातीच्या मार्गावर विनाकठड्याची विहीर आहे. अंधारात सचिन याला दिसली नाही, तो पाय घसरुन पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळला. पोहता येत नसल्याने वाचवण्यासाठी त्याने आरडाओरड केली. गावातील तरुणांनी त्याला तत्काळ विहिरीतून बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिकलठाणा पोलीस तपास करत आहेत.