मालमत्तेच्या वादातून युवकाचा दगडाने ठेचून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विकसनासाठी दिलेल्या सामूहिक जागेतील व्यवहार मान्य नसल्याने झालेल्या वादातून चुलत भावानेच भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री पुण्यातील विश्रांतवाडीत घडली. विवेक बाळासाहेब पंचमुख (वय-30 रा. जनार्दननगर, लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद नामदेव पंचमुख (वय-32 रा. शांतीनगर, विश्रांतवाडी) आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या आळंदी रस्त्यावर एसआरए स्किम समोर रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास एकजण गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

विश्रांतवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पंचमुख याने त्याच्या गावात रांजणगाव येथे 2014 मध्ये भावकीचे सामाईक क्षेत्र सर्वांच्या संमतीने विकसनासाठी दिले होते. यांची नोंद रांजणगाव तलाठी कार्यालयात झाली. मात्र, अद्याप काम सुरु न झाल्याने आनंद पंचमुख हा विरोध करत होता. याच वादातून विवेकने आनंदला जिवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री सहा वाजता आनंदने विवेकला शांतीनगर येथे बोलावून घेतले. याच विषयावरून झालेल्या वादातून आनंद याने साथीदारांच्या मदतीने विवेक याचा लोखंडी रॉड व दगडाने ठेचून खून केला.

घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र बोराटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहेत.

Visit : Policenama.com