तरुणाचा विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, वाचविण्यासाठी गावकरी अन् अग्निशामक दल आले, पुढं झालं असं काही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरुणाने आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र त्याला वाचविण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना सुमारे अडीच तास विहिरीच्या कठड्यावरच बसून राहावे लागले. कारण तरुणाने उडी घेतलेल्या विहिरीत एक आठ फुट लांब धामण होती. या धामणच्या भीतीने मदतीसाठी धावून आलेल्या लोकांनी धोका पत्करला नाही. त्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नक्षत्रवाडी येथे एका तरुणाच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे.

किशोर संजय महानोर (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शेतीच्या वादातून झालेल्या घरगुती भांडणानंतर रागाच्या भरात या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजते. किशोर हा अविवाहित असून तो मोठा भाऊ आणि वडिलांसोबत शेती व्यवसाय करतो. शनिवारी सकाळी काही कारणावरून त्याचं घरच्यांसोबत भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आपल्या शेतातील विहिरीत जीव देण्यासाठी उडी घेतली. मुलाला आत्महत्या करताना किशोरच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी आरडाओरडा करुन लोकांना मदतीसाठी बोलावले. गावकरीही मदतीसाठी धावून आले. परंतु विहिरीत आठ फुटांची सळसळती धामण पाहाता कोणीही त्या तरुणाला वाचवण्याचे धाडस करू शकले नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी अग्निशमन दलाला संबंधित घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनीही विहिरीत उतरण्यास नकार दिला. त्यानंतर मनोज गायकवाड आणि सूरज साळवे या दोन सर्प मित्रांनी अथक प्रयत्नानंतर या धामणला पकडून विहिरीतून बाहेर काढले.

त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने किशोरला विहिरीतून बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता. या तरुणाला विहिरीतून बाहेर काढायला तब्बल चार तास लागले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.