वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन –   गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.1) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली. ही घटना वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार परिसरात घडली. विठ्ठल अशोक पानभरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल दुपारी विठ्ठलच्या बहिणीचे लग्न झाले. घरात आनंदाचे वातावरण असताना रात्री मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलुबाजार येथील विठ्ठल पानभरे आणि कुलदीप गाढवे यांच्यामध्ये पूर्वीपासून किरकोळ वाद होते. सोमवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास चारचाकी गाडी लावण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. चिडलेल्या कुलदीप गाढवे याने विठ्ठल याला चाकूने भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विठ्ठलला कुटुंबियांनी उपचारासाठी अकोला येथे नेले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे सोमवारी दुपारी विठ्ठलच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला होता. सर्व व्यवस्थित पार पडल्यानंतर खुनाची घटना घडली. विठ्ठल हा त्याच्या आई-वडीलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहेत. तर आरोपीला दोन मुली आहेत. विठ्ठलच्या मृत्युमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. तसेच हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी गाढवे फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेऊन अटक केली.