बारामतीत 30 वर्षीय तरुण पोलिसाची आत्महत्या !

बारामती :  पोलीसनामा ऑनलाइन –   बारामती शहरामध्ये एका तरुण पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.11) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बारामती पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तुषार सानप (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. तुषार हे शहरातील पोलीस वसाहतीमध्ये वास्तव्यास होते. येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली आहे. त्यामुळे त्यांची पत्नी माहेरी असून सध्या ते घरात एकटेच राहात होते. मुलगी झाल्यानंतर तुषार यांनी सोशल मीडियावर मुलीच्या आगमनाची माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला होता. मात्र, अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तुषार यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

तुषार सानप यांनी आत्महत्या केल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार यांच्या आत्महत्येमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन असून तुषार हे बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत होते. तुषार यांनी सुरुवातीला बारामती क्राईम ब्रांच पथकात काम केले. त्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षापासून ते शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.