मंदिरात लग्न केल्यानंतर स्वीकारण्यास दिला नकार, तरुणीची आत्महत्या

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    मंदिरामध्ये तरुणीसोबत लग्न केल्यानंतर तरूणाने दुसऱ्याच मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर तरुणाने मंदिरात लग्न केलेल्या मुलीला नकार दिल्याने तिला धक्का सहन न झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. किरण पांडुरंग पवार (रा. शळद, ता बाळापूर जि. अकोला) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करम्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षापासून ते 9 जून 2020 या कालावधीत हा घटनाक्रम घडला आहे. फिर्यादीचे कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. ते कामानिमित्त बोऱ्ह्डेवाडी, मोशी येथे वास्तव्यास आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत मंदिरात लग्न केले.

दरम्यान, लग्न झालेले असताना आरोपीने स्वत:चे दुसरे लग्न ठरवले. दुसऱ्या मुलीसोबत त्याने साखरपुडा केला. त्यानंतर त्या तरुणाने मंदिरात लग्न केलेल्या मुलीला स्विकारण्यास नकार दिला. हा धक्का मुलीला सहन न झाल्याने तिने 9 जून रोजी आपल्या राहत्या घरी बोऱ्हाडेवाडी मोशी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.