सांगलीत लॉजमध्ये युवतीचा खून, रुमालाने आवळला गळा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये युवतीचा रूमालाने गळा आवळून खून करण्यात आला. वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय 20, रा. पंचशीलनगर) असे मृत युवतीचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लॉजच्या कागदपत्रांची तपासणी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर अविनाश लक्ष्मण हत्तीकर (वय 25, रा. पंचशीलनगर) संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वृषाली सूर्यवंशी कुटूंबासह शहरातील पंचशीलनगर येथे रहात होती. त्याच परिसरात राहणाऱ्या अविनाश हत्तीकर याची तिच्याशी ओळख होती. वृषाली बुधवारी दुपारी मैत्रीणीकडे जाते असे कुटुंबियांना सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री साडेआठच्या सुमारास अविनाश आणि वृषाली बसस्थानक परिसरातील टुरिस्ट लॉजमध्ये आले. लॉजमध्ये दोघांनाही ओळखपत्र देवून रूम घेतली होती.

दरम्यान, गुरुवारी टुरिस्ट लॉजमध्ये युवतीचा खून झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अमित परीट यांना मिळाली. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना कळविले. त्यानंतर शहरचे निरीक्षक अजय सिंदकर, संजयनगरचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रूमला बाहेरून कडी लावण्यात आल होती. पोलिसांनी रूम उघडल्यानंतर वृषाली बेडवर मृतावस्थेत दिसली. प्राथमिक तपासात रूमालाने गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तापसणी केल्यानंतर संशयित अविनाश हत्तीकर रात्रीच पसार झाल्याचे दिसून आले.

पोलिस पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संशयिताच्या शोधासाठी तातडीने पथके रावाना करण्यात आली आहेत. खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

visit : policenama.com 

You might also like