‘कोरोना’ संशयित म्हणून बसमधून तरूणीला फेकलं, झाला मृत्यू

नोएडा : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. याच दरम्यान कोरोनाची संशयित रुग्ण असल्याचे समजून एका 19 वर्षीय तरूणीला बसमधून फेकून देण्यात आले. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसमधून फेकल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तर पोलिसांनी मात्र हा नैसर्गिक मृत्यू असल्याने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे वृत्त समोर येत आहे.

दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातल्या नोएडा येथे ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेश रोडवेजच्या बसने ही युवती नोएडाहून तिचं गाव असलेल्या सिकोहबादला निघाली होती. आई आणि बहीण बसमध्ये चढतल्या तेव्हा तिची प्रकृती ठणठणीत होती. असा दावा तरुणीच्या भावाने केला आहे. बसमधून फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा त्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेश रोडवेजच्या या बसमधून प्रवास करणारी तरुणी आजारी दिसल्यावर तिला बसमधल्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरायला सांगितले. तिला कोरोनाची लागण झाल्याचा त्यांना संशय आला. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षाची अंशिका नावाच्या या तरुणीचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाला आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा झटापटीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या, असे पोलिसांनी सांगितले. हा नैसर्गिक मृत्यू असल्याने गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोस्ट मार्टेमचा रिपोर्टसुद्धा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगतो, असेही पोलीसांनी सांगितले.

अंशिकाच्या भावाचा आरोप आहे की, आपली बहीण बसमध्ये बसण्यापूर्वी बरी होती. उकाड्यामुळे जीव घाबरा होऊन तिची शुद्ध हरपली होती. बसमधून तिला जबरदस्तीने उतरवण्यात आलं. मथुरा टोल प्लाझाजवळ तिला खाली फेकण्यात आलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मृत मुलीचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून नोएडात काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव दिल्ली-नोएडात वाढल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.