धक्कादायक ! आधी लग्न केले म्हणून मोठ्या भावाने छोट्या भावासह त्याच्या पत्नीची केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या भावाने आपल्या आधी लग्न केले या रागातून मोठ्या भावाने छोट्या भावासह त्याच्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दतियामध्ये हा प्रकार घडला असून मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. किशन कुशवाहा आणि प्रियंका किशन कुशवाहा अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संतोष कुशवाहा याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड देखील जप्त केली आहे.

दतियाचे एसडीओपी सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, बेहरुका गावात राहणारा संतोष कुशवाह हा काही दिवसापासून मानसिक तणावात होता. दरम्यान त्याच्या आधी छोटा भाऊ किशनचे प्रियांका बरोबर लग्न झाले यामुळे तो आणखी तणावात गेला. किशन आणि प्रियांका झोपेत असताना संतोषने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीचा वार एवढा जोरात होता की एकाच झटक्यात त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना हि माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संतोष कुशवाहा हा हत्या करून तेथून पसार झाल्याचे सुमित अग्रवाल यांनी सांगितले. तर दुसरीकडे घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सांगितले कि, छोट्या भावाचे लवकर लग्न झाल्याने संतोष मानसिक तणावात होता. आपले लग्न होईल की नाही या चिंतेने त्याला ग्रासले होते. मात्र लग्नाच्या कारणावरून तो एवढा मोठा हत्याकांड करेल असे कोणाला वाटले नव्हते. असे लोकांनी सांगिलते.