‘दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले ?’ : जयसिंह मोहिते पाटील

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका अशी टोकाची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली होती. या टीकेला विजयसिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे. दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले, पायाखालची वाळू सरकू लागल्याने देशाचे नेते गल्लीतल्या राजकारणात उतरले, अशा शब्दात जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तर दिले. ते अकलूज येथील सभेत बोलत होते.

अकलूज येथे झालेल्या सभेत जयसिंह मोहिते पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थित शरद पवारांवर निशाणा साधत माढ्यातून माघार का घेतली असा सवाल त्यांनी केला. विजयदादांना यंदा माढ्याचे तिकीट पक्के असताना उंदरासारखे खेळवायला या नेत्याने सुरुवात केल्यावर आता या मांजरालाच पकडू अशी भूमिका घेतल्याने लंगोट लावलेले पळून गेले. यावेळी तुमच्या मांड्याही पाहायला सगळ्यांना मिळाले असते मात्र तुम्ही पळून गेलात. दादांची चड्डी काढताना त्यांच्या मांड्या किती भक्कम आहेत हे कार्यकर्ते दाखवून देतील असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.

पायाखालची वाळू सरकली की माणसाचा तोल जातो, वय समजत नाही, कोणत्या पदावर आहे हे समजत नाही, असे सांगत महाराष्ट्रात राष्ट्रवादीची फक्त एक जागा जिंकून येईल असे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. आपल्या दुष्काळी भागातील वर्षानुवर्षे रेंगाळलेली पाणी योजना पूर्ण करण्याची धमक फक्त मोदी सरकारमध्ये असून विरोधकांचे काम खेकड्यासारखे सुरु असल्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.