चिंताजनक ! अपघातात बळी पडणार्‍यांमध्ये सर्वाधिक तरुण, राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोची माहिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बेदकारपणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांमध्ये तरुणांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2019 या वर्षांत देशात तब्बल 4 लाख 21 हजार 104 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 18 ते 45 या वयोगटातील तरुणांचे 57 टक्के प्रमाण आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

देशात गेल्या वर्षी 7 लाख 01 हजार 324 अपघातांची नोंद झाली. त्यामध्ये 4 लाख 12 हजार 959 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 46 हजार 284 लोक जखमी झाले. त्याशिवाय 8 हजार 145 लोकांचा नैसर्गिक अपघातात मृत्यू झाला. अपघातांमध्ये 30 ते 45 वयोगटातील सर्वाधिक 31 टक्के म्हणजे 1 लाख 30 हजार 212 लोकांचा मृत्यू झाला. दुसर्‍या क्रमांकावर 18 ते 30 वयोगटातील 1 लाख 09 हजार 378 जणांचा मृत्यू झाला. अपघातांमध्ये तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण 57 टक्के इतके असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मागील वर्षी महाराष्ट्रात 3 हजार 927 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तर देशात 1 लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.