सरकारचा इशारा : टोल टॅक्सचे पूर्ण पैसे न भरल्यास फास्टॅग आणि बँक खाते होईल सील

नवी दिल्ली : वृत्त संस्था – फास्टॅग तंत्रज्ञानाने सरकारचा महसूल वेगाने वाढत आहे, तसेच देशभरातील टोल प्लाझावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होत आहे. परंतु मानवरहित टोल व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक वाहने कमी टोल टॅक्स भरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा वाहन चालकांनी सावध व्हावे, कारण सरकारने त्यांचे फास्टॅग आणि बँक खाते सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, सर्व प्रकारच्या खासगी कारसाठी जांभळ्या रंगाचा फास्टॅग दिला जातो. आणि टोल प्लाझावर त्यांच्यासाठी टोलचा दर एक समान आहे. परंतु, तीन चाकी आणि चार चाकी व्यवसायिक वाहनांच्या टोल टॅक्सचा दर त्यांच्या अ‍ॅक्सलनुसार ठरवला जातो. यासाठी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार जांभळा, गुलाबी, नारंगी, पिवळा, आकाशी आणि काळ्या रंगाचा फास्टॅग त्यांच्या अ‍ॅक्सल भारानुसार जारी केला जातो.

टोल प्लाझावर वाहनाच्या फास्टॅगच्या रंगाच्या आधारावर आपोआप टोल टॅक्स भरला जातो. अधिकार्‍यांनी म्हटले की, अनेक ठिकाणी व्यावसायिक वाहने ठरलेला फास्टॅग लावत नसल्याने कमी टोल टॅक्स भरण्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, यांची संख्या जास्त नाही. अशा वाहनांचा फास्टॅग आणि बँक खाते सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्यामुळे त्या वाहनाला दुप्पट टॅक्स द्यावा लागेल. विभागाची ही कमतरता दूर करण्यासाठी काम सुरू आहे. ज्यामुळे कमी टॅक्स देणार्‍या वाहनांकडून दंडासह पूर्ण टॅक्स वसूल केला जाईल.

अशी पकडली जातात कमी टोल भरणारी वाहने
रस्ते परिवहन मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सांगितले की, ऑटोमॅटिक व्हेईकल क्लासीफायर तंत्रज्ञानाने कमी टॅक्स भरणारे वाहन पकडले जाते. उदाहरणार्थ ऑटोमॅटिक व्हेईकल क्लासीफायर वाहनांचे फोटो काढते आणि असे वाहन पकडले जाते. सध्या ऑनलाइन तक्रारीनंतर टोल कंपनीला पूर्ण पैसे मिळतात, परंतु सरकारला चूना लावला जात आहे.