गृह अन् वाहन कर्जावरील EMI वाढणार, नव्या आणि जुन्या ग्राहकांवर असा होणार परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्त संस्था – अनेक जण घरासाठी किंवा वाहन घेण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतात. कर्ज घेतांना कर्जदारांसाठी व्याजदर हा अंत्यत महत्वाचा असतो. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच गृहकर्जाचे व्याजदर पाव टक्क्याने वाढवले आहेत. तसेच बँकेने आपली कमी व्याजदराची योजना आता बंद करून कर्जाचे व्याजदर आता पूर्वीच्याच पातळीवर आणले आहेत. स्टेट बँकेपाठोपाठ आता देशातील इतर बँकाही व्याजदर वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जदारांच्या कर्जाचा मासिक हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

पैसा बाझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नवीन कुकरेजा यांच्या मते, एसबीआयने गृहकर्जाची विशेष योजना मागे घेतल्यानंतर नवीन लागू होणाऱ्या व्याजदरात पाव टक्क्याची वाढ होणार आहे. मात्र याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण स्टेट बँकेनंतर इतर बँकाही आपले व्याजदर वाढवतील.

नवीन ग्राहकांनी फिक्स दराने कर्ज घ्यावे ?
बॅंकाचे व्याजदर वाढत असतील तर नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांनी फिक्स दराने कर्ज घेणे अधिक फायद्याचे ठरते. बँक बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी म्हणाले की, सध्या व्याजदर वाढत आहेत. त्यामुळे फिक्स दराने गृह, वाहन किंवा अन्य कर्ज घेणे लाभदायी ठरेल. याचा व्याजदर कमी असतो.

जुन्या ग्राहकांनी मुदतवाढ न घेता हफ्ता भरणे फायद्याचे
कर्जाचे व्याजदर वाढवल्यावर बँक आपल्या कर्जदारांना हप्ता वाढवण्याची किंवा मुदत वाढवण्याचा पर्याय देत असते. कर्जाची मुदत वाढवण्याचा पर्याय सर्वच ग्राहकांना मिळत नाही. कर्जाच्या मुदतीचा कालावधी कर्जदाराच्या निवृत्तीनंतर वाढवण्यास बँका परवानगी देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांकडे अपफ्रंट पेमेंट करून कर्जाचा हप्ता आहे, तेवढाच ठेवण्याचा पर्यायाच उरतो. तुमच्या मासिक उत्पन्नात तुम्हाला कर्जाचा वाढीव हप्ता भरणे शक्य असेल तर मुदतवाढ न घेता वाढीव हप्ता भरणे फायद्याचे आहे.