अजित पवार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, म्हणाले – ‘तुमची कामगिरी एकदम बेकार सुरु’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यावर चांगलेच भडकले. तुमची कामगिरी एकदम बेकार सुरु आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई 55 कोटींवरुन 130 कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर, यांची एक समिती करुन लवकरात लवकर अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करुन देऊ, असेही अजित पवार यांनी सांगितले.

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहीनीच्या प्रलंबित कामांवर चार्चा करण्यासाठी अजित पवार यांनी मंगळवारी (दि.11) मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली इत्यादी या बैठकीला उपस्थित होते.

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाची नुकसानभरपाई 55 कोटी निश्चित करण्यात आली होती. मात्र, माढ्यातील राजकीय नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकडन वाढवून घेतले. त्यामुळे ही रक्कम 130 कोटी रुपयांवर गेली आहे. मूल्यांकन कसे वाढले याची चौकशी करा, असे आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी दिले. जिल्हाधिकारी यांच्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच यासंदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.