पाळीव कुत्रा मालकाच्या भावनाही जाणतो 

पोलीसनामा ऑनलाइन टीम-पाळीव कुत्र्याशी आपण बोलत असताना तो ऐकत असतो. शिवाय तो तुमच्या भावनादेखील जाणतो. मालकाच्या भावनांचा कुत्र्याच्या भावनांवर परिणाम होतो. मालक जर तणावात असेल तर कुत्रादेखील तणावात असतो. मालक सुखात असेल तर तो सुखात असतो. मालक दु:खात तर तो दु:खात असतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

स्विडिश संशोधकांनी केलेल्या या संशोधनासाठी संशोधकांनी ५८ कुत्रे आणि त्यांच्या मालकांचा अभ्यास केला. यापैकी ३३ कुत्रे शेटलँड शीपडॉग तर २५ कुत्रे बॉर्डर कोललाईज जातीचे होते. मालक आणि कुत्र्यांच्या वागणुकीबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नोंद करण्यात आली. याशिवाय वर्षभराच्या कालावधीसाठी त्यांच्यातील कोर्टिसॉल या स्टेस हार्मोन्सची पातळीदेखील तपासण्यात आली. कुत्र्याच्या कोर्टिसॉलची पातळी तपासण्यासाठी त्यांच्या केसांचे नमुने घेण्यात आले.

या संशोधनातून असे दिसून आले की, संपूर्ण वर्षभरात कुत्रा आणि त्यांच्या मालकातील कोर्टिसॉल पातळीत साम्य होते. उन्हाळ्यात ५७ कुत्र्यांचे आणि हिवाळ्यात ५५ कुत्र्यांचे आणि त्यांच्या मालकाच्या कोर्टिसॉल पातळीत साम्य होते. मालकाच्या कोर्टिसॉल पातळीप्रमाणे कुत्र्यांची कोर्टिसॉल पातळी कमी-जास्त होत होती. तर कुत्र्याची पर्सनॅलिटी आणि त्याच्या शारीरिक कार्यामुळेही या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम झालेला नव्हता. नर कुत्र्याच्या तुलनेत मादी कुत्रा आणि त्याच्या मालकामध्ये सर्वाधिक घट्ट संबंध असतात. मादी कुत्रा मालकासोबत असताना तिच्यात ऑक्सिटोसिन ज्याला लव्ह हार्मोन्स असे म्हटले जाते, त्याची पातळीदेखील वाढत होती. हा परिणाम नर कुत्र्यात संशोधकांना आढळला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like