डॉक्टरचे अ‍ॅप्रन घालून ‘तो’ करत होता वाहनचोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डॉक्टरचे अ‍ॅप्रन घालून वाहने चोरणाऱ्या बनावट डॉक्टरला फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातून चोरी केलेल्या तब्बल २६ दुचाकी, ३ चारचाकी, १ टेम्पो अशी २७ लाख २५ हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर एकूण २५ गुन्हे उघडकिस आणण्यात आली आहेत.

शाहरुख रज्जाक पठाण (२२, बुधाची वाडी, बनपुरी ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी शाहरुख पठाण हा शहर व परिसरातून वाहने चोरी करत असल्याची माहीती पोलीस कर्मचारी शंकर कुंभार यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने शहरातून तब्बल ३० वाहने चोरली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २६ दुचाकी, ३ चारचाकी, १ टेम्पो अशी २७ लाख २५ हजार रुपये किंमतीची वाहने जप्त केली. तर पुणे शहरातील २४ तर दौंड पोलीस ठाण्यातील १ असे २५ गुन्हे उघडकिस आणली आहेत.

डॉक्टर असल्याचे भासवून करायचा वाहन चोरी

शाहरुख पठाण हा कोणाचा संशय येऊ नये म्हणून अंगावर डॉक्टरांचा अ‍ॅप्रन घालून फिरत होता. तसेच तो बॅगेत डॉक्टरांना आवश्यक असलेले साहित्य घेऊन एप्रनवर नेम प्लेट लावत होता. त्यानंतर पोलिसांनी किंवा नागरिकांनी हटकले की, डॉक्टर आहे चोर नाही, म्हणून सांगत होता. चारचाकी वाहनातून जाऊन चलाखीने वाहने चोरत होता. शहर व परिसरातून त्याने तब्बल ३० वाहने चोरली आहेत. पुढील तपास सुरु आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांटच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी  बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, दिनेश भांदूर्गे, अमोल सरडे, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण, विशाल चौगूले, हर्षल शिंदे, महावीर वलटे, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी, अमेय रसाळ यांच्या पथकाने केली.