बेरोजगारी विषयी मंत्र्याला जाब विचारला म्हणून तरुणाला अटक

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना नोकरीसंदर्भात प्रश्न विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. आम्हाला नोकरी का मिळाली नाही असा प्रश्न तरुणाने विचारल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते ट्रेजानो डिमेलो यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. विश्वजीत राणे उत्तर गोव्यातील वालपोईमध्ये प्रचार आणि बैठकीसाठी आले होते. त्यावेळी दर्शन गावकर नावाच्या तरुणाने राणे यांना नोकरीसंदर्भात प्रश्न विचारताना आपण 10 वर्षांपासून राणे यांचे समर्थक आहोत.

आम्ही त्यांच्यासाठी काम केले आहे. राणे यांनी आम्हाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. तरीही , अजून नोकरी का मिळाली नाही ? असा प्रश्न विचारला. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली व नंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली.

या घटनेविषयी राणे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हे विरोधी पक्षांचे षडयंत्र असून या तरुणाने बैठकीचे वातावरण बिघडवण्यासाठीच प्रश्न आरडाओरडा करत अयोग्य पद्धतीने प्रश्न विचारला होता. असा आरोप राणे समर्थकांनी केला आहे.