भिवंडीत एकतर्फी प्रेमातून आईसमोर मुलीवर सपासप वार, आरोपीने स्वत:चाही गळा चिरला

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकू हल्ला केला. आरोपी मुलाने आईसमोर मुलीवर चाकूने सपासप वार केले. ही खळबळजनक घटना भिवंडी शहरातील फेनागाव परिसरात काल संध्याकाळी घडली. तरुणाने मुलीवर वार केल्यानंतर त्याच चाकूने स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 18 वर्षाचा असून पीडित मुलगी अल्पवयीन आहे. या दोघांवर कळव्यतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार काल संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडला. आरोपी तरुणाचे मुलीवर एकतर्फी प्रेम होते. हा तरुण तिची नेहमीच छड काढत होता, अशी तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी केली होती. तसेच तरुणाच्या कुटुंबालाही याची माहिती देण्यात आली होती. मात्र याचा राग मनात ठेवून आरोपीने धारदार शस्त्राने मुलीच्या घरात प्रवेश करून आईसमोरच मुलीच्या गळ्यावर सपासप वार केले. यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करून तिथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोघांना तात्काळ भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी शहर पोलीस पुढील तपास करत असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.