सॉफ्टवेअर खरेदीच्या बहाण्याने ३८ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कंपनीचा आयटी हेड असल्याचे सांगून सॉफ्टवेअर खऱेदीच्या बहाण्याने पुण्यातील एका फर्मला तब्बल ३८ लाख ६८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृतिका रावसाहेब बाळूमाने (३०, सदाशिव पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतिश दत्तु काळे (२८, कल्याण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुण्यात आर. के. सोल्युशन्स नावाची फर्म आहे. सतिश काळे याने नोव्हेंबर २०१८ मध्ये फोन करून तो सांताक्रुझ येथील नारंग रिएलीटी कंपनीचा आयटी हेड असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीला आर. के. सोल्यूशन्स मधून मायक्रोसॉफ्ट एम एस ऑफिसच्या सॉफ्टवेअरच्या लायसन्स कॉपी हव्या आहेत. असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून १४ हजार ४६७ रुपये किंमतीच्या एकूण २१० प्रती मागवून घेतल्या. त्यापोटी त्याने ३८ लाख ६८ हजार रुपये देणे आहे. मात्र ही रक्कम १५ दिवसात देतो असे सांगितले. परत दिली नाही.

त्यानंतर काळे याने सांताक्रुझ येथील एचडीएफसी बँक व दहिसर येथील आयडीबीआय बँकेचे चेक दिले. परंतु त्या खात्यांमध्ये पैसेच नसल्याने ते वटले नाहीत. यासंदर्भात फिर्यादींनी नारंग रिएलीटीशी संपर्क साधल्यावर त्यांना यासंदर्भात माहितीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करत आहेत.