भावी पत्नी पळून गेल्याने तरुणाची आत्महत्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला भावी पत्नी पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने आणि नैराश्य आल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साखरपुडा आटोपल्यानंतर भावी पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने तो नैराश्येत होता. ही घटना शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्फापूर येथे उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने भावी वधूसह तिचा प्रियकर व अन्य दोघांना आत्महत्येस कारणीभूत ठरवले आहे.

सुखदेव शामलाल कवळे (वय – २६, रा. सर्फापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुखदेव याचे काही महिन्यांपूर्वी परतवाडा शहरालगत कांडली येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत लग्न जमले होते. मोठय़ा थाटामाटात सुखदेव आणि त्या तरुणीचा साखरपुडाही पार पडला. परंतु, काही दिवसांतच सुखदेवची भावी वधू तिच्या प्रियकरासोबत घरून पळून गेली. या प्रकाराचा सुखदेवला मानसिक धक्का बसला. त्याने आत्महत्येचा निर्णय घेत २२ फेब्रुवारीला दुपारी गावातील पोलीस पाटील विनोद घुलक्षे यांच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. आपल्या मृत्यूस भावी वधू तिचा प्रियकर, बहीण हेमा व भाऊ रोहित जबाबदार असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर सुखदेवचे वडील शामलाल भिकूजी कवळे (वय-६०) यांनी शिरजगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

Loading...
You might also like