सोलापूर : सावकारांच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर येथील एका युवकाने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक अशोक गवळी (रा.अशोकनगर, उत्तर सदर बझार, लष्कर) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दिपकची आई सुनीता अशोक गवळी यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, सुनीता गवळी यांनी म्हटले आहे, त्याने बहिणीच्या लग्नाकरिता रेखा डोलारे हिच्याकडून २ वर्षांपूर्वी ५० हजार रूपये १० टक्के व्याजाने घेतले होते. तसेच आकाश मोहिते याच्याकडून २० हजार रूपये २० टक्के व्याजाने घेतले होते. शुभम फटफटवाले याच्याकडून ५ हजार रूपये १० टक्के व्याजाने घेतले होते. दीपकने त्यापोटी काही रक्कम परतफेडही केली, मात्र तरीही तिघेही दीपकला जिथेतिथे व्याज व मुद्दलासाठी मागणी करत होते. त्यामुळे दीपकला अधिक त्रासदायक झाला होता.

दरम्यान, दीपकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रेखा सुनील डोलारे (रा. मातंग वस्ती), आकाश मोहिते (रा. रविवार पेठ), शुभम फटफटवाले (रा.लष्कर) या तिघांविरुद्ध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मागील १९ मार्च मध्ये रेखा डोलारे हिने सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान दीपकच्या घरी येऊन त्याला आणि त्याच्या आईला शिवीगाळ केली होती. तर दीपक हा सतनाम चौकात मित्रांबरोबर उभा असताना सावकार शुभम फटफटवाले याने त्याला पैसे दे नाहीतर तुला शेतात नेऊन बांधून मारीन, अशी धमकी देण्यात आली होती. तर याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सोळंखे करत आहेत.