परळीत स्कॉर्पिओमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

बीड (सिरसाळा) : पोलीसनामा ऑनलाइन – परळी तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर एका स्कॉर्पिओमध्ये रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. 10) सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय सखाराम यमगर (वय-30 रा. दगडवाडी. ता. परळी) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा खूनाचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विजय हेच गाडीचे मालक असून त्यांचा गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय होता.

कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर रस्त्याच्या कडेला रात्रीपासून एक स्कॉर्पिओ (एमएच-24 व्ही-5148) उभी होती. सकाळी शेतात जाणार्‍यांनी या गाडीमध्ये डोकावून पाहिले. मात्र गाडीत कुणीच दिसले नाही. पाठीमागच्या सिटवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीसांना माहिती दिली असता पोलीस उपअधीक्षक राहुल धस व परळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ण शर्ट रक्ताने माखलेला असून डोक्यामध्ये शस्त्राने वार करण्यात आले आहेत. धारदार शस्त्राने डोक्यात वार करून मृतदेह स्कार्पिओ मध्ये ठेवून आरोपी फरार झाले आहेत.

हा प्रकार आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like