शिवज्योत घेऊन जाताना शिवभक्ताचा मृत्यू

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवजयंती नियमित्ताने शिकवज्योत आणताना धाप लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सौरभ संभाजी अतिग्रे (२१) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी शहापूर चौक परिसरात घडली. याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेनंतर मात्र शहापूर परिसरातील शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हातात शिकवज्योत… अन अचानक सौरभ खाली कोसळला

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. शिवज्योत नेण्यासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे सकाळपासूनच युवकांची मोठी गर्दी उसळली होती. शहापूर येथे जय शिवराय तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत होती. याठिकाणी शिवज्योत नेण्यासाठी सौरभ अतिग्रे मित्रांसमवेत शिवतीर्थ येथे आला होता.

तेथून शिवज्योत घेवून मोठ्या उत्साहात शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून तो शहापूरकडे निघाला होता. यावेळी वाटेतच विक्रमनगर येथे काही युवकांनी त्याच्याकडे शिवज्योत सोपवण्याची मागणी केली. मात्र सौरभने मंडळापर्यंत शिवज्योत नेण्याची इच्छा बोलून दाखविली. शिवज्योत घेवून मंडळाजवळ आल्यानंतर धाप लागल्याने सौरभ खाली कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली.

शहापूर परिसरात शिवजयंती कार्यक्रम रद्द

मित्रांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली. सौरभचा दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार असायचा. तो मंडळाचा हिरीरीचा कार्यकर्ता होता. त्याचा मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला. शहापूर परिसरातील शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.