धक्कादायक ! सर्पदंशानंतर 4 तासात उपचार न मिळाल्यानं युवकाचा मृत्यू

दापोली : पोलीसनामा ऑनलाईन – शासनाच्या आरोग्य केंद्रांमधील भोंगळ कारभारामुळे बऱ्याचदा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ऐन वेळी डॉक्टर गैरहजर असतात किंवा ऐन तातडीच्या वेळी उपचारासाठी ताटकळत राहावे लागल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे घडली. येथील दापोली तालुक्यातील टेटवली गावचा रहिवासी असणारा पंकज कदम या युवकाचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्याला तब्बल ४ तास उपचाराविना ताटकळत राहावे लागले. तातडीची केस असूनही डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

नेमके काय आहे प्रकरण :
२० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पंकज कदम (रा.मळेकर वाडी, टेटवली, ता. दापोली) यास विषारी साप चावला असता त्याने स्वतः साप मारून मदतीसाठी भावंडांना उठवले. त्यानंतर त्याची भावंडे, काका इ. नातेवाइकांसहित उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आले असता तिथे डॉक्टर हजर नव्हते. त्यानंतर त्यांनी ४ तास वाट पाहूनही उपचारासाठी डॉक्टर आले नाहीत. त्यानंतर देखील डॉक्टर तेथे आले असता अत्यवस्थ रुग्नावर उपचारांना नकार देऊन तेथून हलवण्यास सांगितले. त्यावेळी नातेवाईकांनी पंकजला शहरातील एका खासगी दवाखान्यात म्हणजेच चिपळूण येथील डेरवण रुग्णालयात हलवले. परंतु तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता.

यानंतर संतप्त ग्रामस्थ नागरिकांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत दापोली पोलिस स्थानकासमोर हे आंदोलन केले. मयताचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन हे आंदोलन केले. यावेळी डॉक्टरांच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या गेल्या.

आरोग्यविषयक वृत्त –