Pune News : पायी चालताना मोबाईलवर बोलणं जीवावर बेतलं ! पुण्यातील बाजीराव रोडवर काँक्रिट मशिनचा धक्का लागल्यानं तरूण जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पायी चालताना मोबाईलवर बोलणं जीवावर बेतल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बाजीराव रोडवर घडली. वर्दळीतून पायी मोबाईलवर गप्पा मारणार्‍या युवकाला टेम्पोच्या पाठीमागील बाजूस अ‍ॅटॅच असलेल्या कॉक्रिट भरण्याच्या मशिनचा धक्का लागला आणि तो युवक मशिनच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

पवन संजय गीते (25, रा. पठारेवस्ती, खराडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक बाबासाहेब सुर्यकांत गवळी (40, रा. खराडी) याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पवन हा बाजीराव रस्त्यावरील पादचारी मार्गावरून न जाता रस्त्याच्या कडेने शनिवारवाडयाकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून टेम्पोचालक गवळी हा त्याच्या ताब्यातील वाहन अन् त्याच्यासोबत जोडलेले काँक्रिटचे मशनि घेऊन तिकडेच जात होता. तुळशीबागेजवळील पवित्रीका या दुकानासमोरील बॅरिकेड्सच्या पलीकडून रस्त्याने जात असतानाच टेम्पोच्या मागं जोडलेल्या काँक्रिटमशीनच्या चाकाखाली पवन गीते आला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते.