Bhiwandi News : दुर्देवी ! गोदाम दुर्घटनेमध्ये जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील दापोडे ग्रामपंचायत परिसरातील हरिहर कंपाऊंड मध्ये सोमवारी सकाळी तळ अधिक एक मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत ढिगाऱ्या खालून सात तासांनी जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या हृतिक सुरेश पाटील (१९, रा. डुंगे) याची रुग्णालयात उपचारावेळी प्राणज्योत मालवली असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन वर गेली आहे.

या दुर्घटनेस जबाबदार धरुन पोलिसांनी मूळ गोदाम मालक सूर्यकांत विठ्ठल पाटील, रामचंद्र शांताराम पाटील, महादेव शांताराम पाटील यांच्यासोबत गोदामाच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या व्ही. आय. बिल्डकॉम प्रा. लि या विकासक कंपनीविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला.

भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा झपाट्याने वाढत आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकासक आपल्या ताब्यात घेऊन सुस्थितीत गोदामे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा कमावून स्थानिक मालकांना कमकुवत बांधकामे देत त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तसेच या कमकुवत बांधकामांवर MMRDA प्रशासनाचे लक्ष नसल्याने अनधिकृत बांधकामे होऊन स्थानिक शेतकरी जमीन मालक व सरकार यांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे. विकासकांच्या या मनमानी कारभाराला आळा घालणे गरजेचे असून, MMRDA प्राधिकरणासह महसूल विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.