धक्कादायक ! तरुणाला बेदम मारहाण करत डिझेल ओतून जिवंत जाळले

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – घरासमोर असलेल्या गटारीवरून झालेल्या वादातून ३५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत डिझेल ओतून त्याला जिवंत जाळल्याची घटना सेलू वालूर रोडवरील ब्राम्हणगाव येथे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

सतीश दत्तराव बरसाले (वय ३५) असे जिवंत जाळण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं ?
सतीश बरसाले हे ब्राम्हणगाव येथील राहणारे आहेत. त्यांच्या घरासमोर असलेल्या गटारीवरून खोसे यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा शुक्रवारी वाद झाला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी सतीश बरसाले ट्रॅक्टर घेऊन घरी येत होते. त्यावेळी गावाजवळ असताना उद्धव खोसे, दिगंबर खोसे, राजेभाऊ खोसे, जीवन खोसे, नामदेव खोसे, आसाराम खोसे, गणेश खोसे, काशिनाथ खोसे, रामप्रसाद खोसे, कारभारी खोसे, संपती खोसे यांनी त्यांना अडविले. त्यानंतर त्यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढत रस्त्याच्या कडेला नेले. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दगडाने मारले आणि सतीश यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटविले.

घटनेनंतर तणाव
सतीश यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलीस निरीक्षक संदिपान शेळके, यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सतीश यांचे भाऊ वैजनाथ बरसाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like