रेल्वे अपघात टाळण्यासाठी युवकाच्या प्रकल्पाची केंद्राकडून दखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात रेल्वे अपघातांमुळे जीवितहानीसह आर्थिक नुकसान वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर विद्यार्थ्यांने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे. लोकल, मेल या मल्टिपल रेल्वे ट्रॅकवर विनाचालक धावणार्‍या रेल्वेसाठी हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या प्रकल्पाला गूगलने फेलोशिप दिली आहे. रेल्वे मंत्रालयानेही मॉडेलची दखल घेतली आहे.

अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयातील हर्षल जुईकर संगणक शास्त्र विभागात शिक्षण घेत आहे. त्याने आजवर अनेक लहान मोठे प्रकल्प राबविले आहेत. विद्यापीठाच्या प्रकल्पात त्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल बनविला होता. आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे मॉडेल बनविण्यासाठी त्याने चर्चगेट येथे जाऊन मोटरमन, स्टेशन मास्टर, टीसी, रेल्वे कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती गोळा केली.

त्यानंतर इटली येथून सेन्सर मागवून स्वत:चे मॉडेल तयार केले. गूगल फेलोशॉपी परीक्षेसाठी हर्षलने आपले मॉडेल पाठविले होते. यात जगभरातून तीन लाख प्रकल्प सादर करण्यात आले होते. यातून हर्षद जुईकर यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे देशाभरातून गूगलने निवडलेल्या प्रकल्पात हर्षलचा प्रकल्प दुसर्‍या क्रमांकावर आहे. गूगलने त्याला फेलोशिप दिल्याचे पत्र पाठविले आहे.