२० लाखासाठी तरुणाचे अपहरण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – इंजिनीयरिंगचे एक वर्ष राहिले असताना नोकरी करणाऱ्या तरुणाचे अपहरणकर्त्यांनी २० लाखांसाठी अपहरण केले. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ सर्व तपास यंत्रणा कामाला लावत २४ तासाच्या आत पौड येथील मुळशी डॅम येथून तरुणाची सुखरूप सुटका केली. अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

वरद शैलेश चिणे (२१, रा. फ्लॅट नंबर ए १०५, रोया हौसिंग सोसायटी, बावधन) असे अपहरण आणि सुटका झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वरदच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद याचे इंजिनीयरिंगचे एक वर्ष राहिले होते. तरीही तो नोकरी करत होता. वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत.

इंदापूर खरेदी विक्री संघाच्या माजी अध्यक्षाचा कोयत्याने सपासप वार करुन खुन 

बुधवारी रात्री पावणे आकराच्या सुमारास वारजे माळवाडी येथून वरद याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मध्यरात्री एक वाजून २० मिनिटांनी वरदच्या वडिलांना फोन करून पैश्याची मागणी केली. तसेच २० लाख कधी आणि कुठे द्यायचे हे उद्या सकाळी सांगतो असे सांगितले. यामुळे सुरुवातीला घाबरलेल्या वरदच्या वडिलांनी स्वतःला सावरून याची माहिती पोलिसांना दिली.

हिंजवडी पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस सर्व यंत्रणा कामाला लागल्या. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा काम करत होत्या. पोलिसांनी तपास करून गुरुवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास पौड येथील मुळशी डॅम येथून वरदला सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांना माहिती मिळाल्याचे समजल्याने अपहरणकर्ते वरदला सोडून पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.