जाडा म्हणाल्याच्या रागातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन भावांमध्ये चिडवाचिडवीवरुन नेहमी भांडणं होत असतात. पण, हीच चिडवाचिडवीची भांडणं एका तरुणाच्या जिवावर बेतली आहेत. मोठ्या भावाला जाडा म्हणून चिडवल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केला. ही घटना रविवारी (दि.३) रात्री दिल्लीच्या नंदनगरी भागात घडली. पोलिसांनी मोठ्या भावाला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

निजाम (वय-२८) आणि आरिफ (वय-२५) हे दोन सख्खे भाऊ नंदनगरी भागात राहत होते. आरिफ हा निजामला त्याच्या जाडेपणावरुन सारखा चिडवत होता. रविवारी अरिफला जाडा म्हणून चिडवले. यावर संतापलेल्या निजामने त्याच्या हातातील कात्रीने आरीफवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कात्री अरिफच्या छातीत घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, निजामने हा अपघात असल्याचा बनाव केला. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर एका तीन वर्षांच्या मुलाने निजामला आरिफवर हल्ला करताना पाहिल्याचं सांगितलं. मुलाच्या साक्षीवरून पोलिसांनी निजामची चौकशी केली, तेव्हा निजामने आपला गुन्हा कबूल केला. भाऊ आपल्याला सतत जाडा म्हणत असल्याच्या रागात त्याची हत्या केल्याचं निजामने पोलिसांसमोर सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी निजामविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.