घरात घुसून तरुणावर चाकूनं सपासप वार, नंतर झाडली गोळी

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणावर चाकूने सपासप वार करून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना भुसावळ शहरात घडली आहे. ही घटना शहरातील श्रीराम नगर भागात घडली असून विलास दिनकर चौधरी (वय-38) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी विलासवर चाकूने वार करून गोळी झाडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मयत विलास हा घराबाहेर फोनवर बोलत उभा होता. त्यावेळी काळे कपडे घालून आलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्या हातावर, पोटावर चाकूने सपासप वार केले. यावेळी विलास घरात पळाला. त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. मात्र, हल्लेखोरांनी पुन्हा घराकडे येऊन दरवाजावर दगडफेक करुन घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी विलावर गावठी पिस्तूलातून गोळी झाडून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखळ झाले. त्यांनी विलास चौधरीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पूर्ववैमनस्यातून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला.