गोळी झाडून युवकाचा खुन करणाऱ्या ‘त्या’ ३ गुन्हेगारांना अखेर जन्मठेप

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सिडकोतील टिप्पर गँगला माहिती देत असल्याच्या कारणावरून अजिंक्य संजय चव्हाण या युवकाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंबड येथील एन. एम. स्विटसच्या मागे दि. १८ जून २०१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. अजिंक्य चव्हाण या युवकाचा गोळी झाडून खून करण्यात आला होता, तसेच आरोपींनी या घटनेनंतर कपडे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

अजिंक्य हा सिडकोतील टिप्पर गँगचा शाकीर पठाण व गण्या वाघ उर्फ कावळ्या यास माहिती देत असल्याचा संशय असल्याने संदीप भालचंद्र वाघ (रा. राजरत्ननगर, सिडको), योगेश रघुनाथ मराठे (रा. साईबाबानगर, सिडको), दिनेश राजाराम पाटील (रा. उपेंद्रनगर, सिडको), योगेश दादाजी निकम (रा. उपेंद्रनगर, सिडको), गणेश शेषराव मुसळ (रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. अजिंक्य यास मोबाइल करून बोलावून घेत संशयितांनी त्याचा काटा काढला होता.

या प्रकरणामुळे अंबड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सहायक निरीक्षक संतोष खडके यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील पुराव्यांची साखळी जोडून तपास केला. त्यानंतर आरोपींविरुद्ध जिल्हा न्यायालयात भारतीय दंड संहिता कलम ३०२,२०१,३४ अन्वये आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीत आरोपींनी अजिंक्यचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संदीप भालचंद्र वाघ( रा. राजरत्ननगर,सिडको), योगेश रघुनाथ मराठे( रा. साईबाबानगर,सिडको) व दिनेश राजाराम पाटील ( रा. उपेंद्रनगर, सिडको) या तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच कलम २०१ अन्वयेही दोषी धरून त्यांना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे रवींद्र निकम यांनी कामकाज चालविले. अन्य आरोपींविरुद्ध मात्र आरोप शाबीत झाला नाही.

बहुचर्चित ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट दिग्दर्शकाच्या वडिलांवर गुन्हा दाखल