मुलीला फूस लावून पळवल्याच्या संशयातून तरूणाच्या भावाचा गळा चिरून खून

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुलीला पळविल्याच्या संशयातून तरुणाच्या भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथे हा प्रकार घडला आहे. आंतरजातीय प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आली.

भीमराज बाळासाहेब गायकवाड (वय 17) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात भीमराज याचे आईवडिल गंभीर जखमी झाले आहेत. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी रोहिदास देवकर आणि देविदास देवकर यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लाख खंडाळा (ता. वैजापूर) येथे शेजारच्या वस्तीवर राहणार्‍या भीमराज गायकवाड याच्या भावाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांना होता. त्या संशयातून तरुणीच्या भावांनी तरुणाच्या कुटुंबियांवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोपींनी रागाच्या भरात तरुणाच्या अल्पवयीन भावाची गळा चिरून निघृण हत्या केली.

तरुण-तरुणी बेपत्ता –
बाळासाहेब गायकवाड यांचा मुलगा अमोल गायकवाड (वय 22) हा 12 मार्चपासून बेपत्ता आहे. तर शेजारील देवकर वस्तीवरील24 वर्षांची मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे अमोलनेच मुलीला पळवून नेल्याचा संशय देवकर कुटुंबियांना होता. त्या रागातूनच तरुणीचे वडील आणि काकांनी बेपत्ता तरुणाच्या घरावर हल्ला केला. आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.