भुसावळ पुन्हा हादरले ! 20 वर्षाच्या तरुणाचा सपासप वार करुन निर्घृण खून

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – भुसावळ शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरून गेले आहे. एका 20 वर्षाच्या तरुणावर सपासप वार करुन खून केल्याची घटना भूसावळ शहरातील खडका रोड भागात घडली आहे. ही घटना रविवारी (दि.13) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. काही दिवसांपूर्वीच एका युवकाचा घरात घसून गोळ्या घालून खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

शेख अल्तमश शेख रशीद (वय-20, रा. बाबला हॉटेल, कमलाबाई बिल्डींग) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रशीद याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने सपासप वार करुन खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्तमश शेख हा खडका रोडवरील एका पुलाजवळ गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्या छातीवर चाकूने वार केले होते.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अल्तमशवर नेमका हल्ला कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस हेल्लेखोरांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात तणावाचे वातावरण

या घटनेमुळे शहरात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अल्तमश याला खासगी रुग्णालयात तातडीने आणण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर हॉस्पिटल परिसरात मृताच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर आरसीपी पथकाला या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.