पुणे : कोयत्याने सपासप वार करुन १९ वर्षीय तरुणाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर आणि पोटात वार करुन १९ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. जुबेर गुलाब मुजावर (१९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वडील गुलाब मुजावर यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वाकड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर ताथवडे येथे एक तरुण बेशुद्ध पडलेला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. जुबेर हा जखमी आवस्थेत आढळून आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. जुबेर याच्या डोक्यात, मानेवर आणि पोटात धारदार हत्याराने वार करण्यात आले आहेत. जुबेर याचा खून कोणी आणि का केला याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.