धक्कादायक… येरवड्यात अनोळखी तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा परिसरात एका तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉन बॉस्को शाळेच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना बॉल कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गेला. त्यावेळी मुलगा बॉल आणण्यासाठी गेला. तेव्हा कचऱ्यात त्याला एक मृतदेह दिसला. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. २० ते २५ वर्षांच्या अनोळखी तरूणाच्या अंगावर टिशर्ट व जीन्स पॅण्ट असून उजव्या दंडावर टॅट्यू गोंदवलेला आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.