पुण्यात डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बालेवाडी येथील मिटकॉन स्कूलजवळ उघडकिस आला. दारू पिताना झालेल्या वादातून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

मारुती रामदास ढवळे (वय २३, रा. मुळ बुलडाणा, सफायर पार्क जवळील लेबर कॅम्प, बालेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

बालेवाडी येथील मिटकॉन स्कूलच्या पाठीमागे एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती सोमवारी सकाळी स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृत त्याची ओळख पटविण्यात आली. तेव्हा तो रामदास ढवळे असल्याचे समोर आले. मारूती ढवळे हा बालेवाडीतील सफायर पार्क परिसरातील लेबर कॅम्प येथे राहतो. मिळेल ते काम करतो. दरम्यान रात्री तो दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिताना त्याचा काही जणांशी वाद झाला होता. त्यातूनच त्याचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.