मेकअपच्या दुकानात झाली ओळख, त्याने चाकू दाखवून केला बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खरेदीसाठी गेल्यानंतर महिलेसोबत झालेल्या ओळखीतून दुकानातील कामगाराने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याघरी जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्य़ात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

अन्सारी शेख (बाबाजान चौक, कॅम्प) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अन्सारी शेख हा कॅम्पातील फॅशन स्ट्रीटमध्ये असलेल्या एका इमिटेशन ज्वेलरी व मेकअपच्या साहित्य विक्रीच्या दुकानात नोकर आहे. पिडीत महिला त्याच्या दुकानात मेकअपचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्यावर त्यांची ओळख झाली. त्यावेळी अन्सारीने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यातून त्यांची ओळख वाढली. या ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. त्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये तो पिडीतेच्या घरी गेला.

त्याने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर याबद्दल कोणाला सांगायचे नाही अशी धमकी दिली. तसेच ३ व ४ एप्रिल रोजी महिलेच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला शिवीगाळ केली. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.