बीड : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला ५ वर्षे सश्रम कारावास

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेतून मैत्रिणीसह चारचाकी वाहनाने जाताना शाळकरी मुलीसोबत असभ्य वर्तन करून तिची छेड काढत तिला व वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ प्रमाणे १ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश नाझेर शेख यांनी सुनावली.

निवास उर्फ पप्पू शंकर गिरे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा प्रकार १ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता.

१ फेब्रुवारी २०१८ रोजी पिडीत मुलगी आणि तिची मैत्रिणीला क्लास सुटल्यानंतर घरी घेऊन जाण्यासाठी तिचे चुलते कार घेऊन आले. त्यावेळी दोघी कारमध्ये पाठीमागे बसल्या होत्या. त्यानंतर त्या त्यांचे फोटो घेण्यासाठी फोटोच्या दुकानात गेल्या होत्या. तेव्हा एक तासानंतर त्या गावाकडे जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी मोंढा नाका येथे आल्यावर त्यांच्याच गावातील शंकर गिरे व त्यांचा मुलगा गाडीत बसले. शंकर गिरे समोरील सीटवर बसले तर त्यांचा मुलगा निवास गिरे हा पाठीमागील सीटवर बसला. त्यावेळी पिडीतेची मैत्रिण बाजूला बसली होती. तर गिरे हादेखील दुसऱ्या बाजूला बसला. मध्यभागी पिडीत मुलगी बसली होती.

काही वेळाने निवास गिरे याने पिडीत मुलीचे चिमटे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. त्याचा हात बाजूला केला तरी तो पुन्हा हात टाकत होता. त्यानंतर त्याने तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. पिडीतेने त्याचा विरोध केला तरीही त्याने तिला बळजबरीने पकडून तिची छेडछाड सुरु ठेवली. त्यानंतर हे कोणालाही सांगू नकोस, नाही तर तुला आणि तुझ्या वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

या सर्व प्रकारानंतर तो पुन्हा असं काहीतरी करू शकतो म्हणून पिडीत मुलीने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गिरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यावेळी तपास अधिकारी एस. व्ही. पवार यांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी पक्षाने यावेळी ६ साक्षीदार तपासले. तसेच पिडीत मुलगी, इतर कागदोपत्री पुरावे, आणि सहायक सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश नाझेरा शेख यांनी त्याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ५ वर्षे सश्रम कारावास, व १० हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ प्रमाणे १ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार धनवजे, हेड कॉन्सटेबल एस. डी. जाधव व महिला पोलीस शिपाई सिंगल यांनी काम पाहिले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like