प्रेमप्रकरणातून तरूणाला तब्बल 1 महिना डांबून ठेवणं पडलं महागात, चौघांना कारावास

यवतमाळ : पोलीसनामा ऑानलाईन – नऊ वर्षापूर्वी प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करून त्याला तब्बल महिनाभर खोलीत डांबून ठेवणा-या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 24) तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

चंद्रजीत सुभाषचंद्र रुमाले, आशिष गजानन भवरासे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, आरोपींनी अरुण विष्णूपंत सरतांबे ( रा. दारव्हा) याचे 13 मे 2012 रोजी यवतमाळातील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून अपहरण करून एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यानंतर तब्बल महिनाभर त्याचा अमानुष छळ केला. अरुणने बंद घराची खिडकी उघडून मदत मागितली असता परिसरातील नागरिकांनी त्याची सुटका केली. अरुणच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी चंद्रजीत रुमाले, दिनेश तोष्णीवाल, विकी उर्फ अनिल विक्रम डहाके, तुषार सुखदेव गुल्हाने, रोशन विनायक गुल्हाने, आशिष गजानन भवरासे, शक्ती रामदास गुल्हाने, संजय विष्णू गुल्हाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी या खटल्यात 10 साक्षीदार तपासले. यात पीडित व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून चौघांना 3 वर्ष कारावास व प्रत्येकी 500 रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पुराव्याअभावी दिनेश तोष्णीवाल, विक्की उर्फ अनिल डहाके, तुषार गुल्हाने यांंना निर्दोष सुटका केली आहे. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. अरुण ए. मोहोड, ॲड. सवीन तायडे, ॲड. रणजीत अगमे यांनी बाजू मांडली. त्यांना अवधूवाडी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.