Pune News : समाजसुधारकांचा वारसा जपला तर तरुणाई समृद्ध होईल : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  तरूणांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सगळा तरूणवर्ग आजच्या घडीला भरकटला आहे असे नाही. राजकारणासह सर्वच क्षेत्रात तरुणांचा वापर करून घेतला जातो. तरुणांना विकासाचे राजकारण समजावून सांगावे लागेल. देशातील महनीय व्यक्ती, थोर समाजसुधारकांचे विचार, वारसा जपला तर आचार-विचारानेही आजची तरुणाई समृद्ध होईल, असा विश्वास तरुणांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या राजकीय व्यक्तींनी आज व्यक्त केला. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून विकासाचे राजकारण केले जावे, अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील (दि. 22 जानेवारी 21) सायंकाळच्या सत्रात ‘प्रबोधनकार ठाकरे आणि आजचे तरुण’ या विषयावर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते. राजकीय, सामाजिक प्रश्नांना दोघाही वक्त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे देऊन उपस्थितांची वाहवा मिळविली. सचिन इटकर यांनी पवार आणि मोहोळ यांना बोलते केले.

संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, नगरसेवक राहुल कलाटे, किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर संपूर्ण महाराष्ट्रात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात नगरसेवक राहुल कलाटे यांच्याकडे व्यक्त केली.

मतदारसंघ निवडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता. कर्जत-जामखेड मतदार संघात विकासाच्या खूप संधी आहेत हे पाहून हा मतदार संघ निवडला. कोथरूड मतदारसंघात प्रबळ दावेदार असताना उमेदवारी मिळू शकली नाही याविषयी बोलताना मोहोळ म्हणाले, उमेदवारी मिळू शकली नाही याबाबत नाराजी असू शकते पण संघटनेत काम करीत असताना वैयक्तिक मतांना महत्त्व नसते. मतदारसंघातील प्रदेशाध्यक्षांचा विजय ही मतदारांकडून मिळालेली कामाची पावतीच आहे.

कुठलाही व्यक्ती त्याची अडचण आपल्याकडे घेऊन आला तर आपल्या एका फोनने त्याची अडचण सुटावी एवढी ताकद मिळावी, असे उत्तर पवार यांनी भविष्यात काय व्हायला आवडेल या प्रश्नाला दिले. तर महापौर म्हणाले, तुम्हाला काय व्हायचे आहे याला आमच्याकडे महत्त्व नसते. कुणी काय करावे हे संघटना ठरविते त्या विषयी संघटनेकडून बंद पाकिट येते. भविष्यात बंद पाकिट आले की ठरवू!

किमान समान कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पवार म्हणाले, लोकांना काय अपेक्षित आहे या दृष्टीने सरकारचे कामकाज व्हावे. लोकांचे हित जपले जावे. सरकारच्या कामकाजातील निर्णय क्षमता वाढावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मोहोळ म्हणाले, तरुणांना योग्य दिशा देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हा आपला उद्देश आहे. आजचा तरूण सक्षम झाला तर देश सक्षम होईल.

एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, भेदभावाचे राजकारण खूप सोपे आहे पण विकासाचे राजकारण खूप अवघड आहे. साहित्यिकांना जे काही मांडायचे असते ते त्यांनी सोप्या भाषेत मांडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रबोधनकारांची भूमिका स्पष्ट असायची त्याप्रमाणे तुम्हाला तुमची भूमिका स्पष्टपणे मांडता येते का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, पक्षात मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पक्षाला, कुटुंबाला अडचणीत आणेल असा कुठलाही निर्णय घेतला जात नाही. सार्वजनिक क्षेत्रात वावरत असताना व्यक्तिगत मत नसते, अशी टिप्पणी मोहोळ यांनी केली.