प्रेमप्रकरणाच्या संशयावरून युवकाचा खून

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमप्रकरणाच्या संशयावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये जखमी झालेल्या युवकाचा यवतमाळ येथे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, आज मृतदेह घेऊन गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन रोष व्यक्त केला. फरार आरोपीला अटक करा, अशी मागणी लावून धरल्याने ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महेश भिवाजी तायडे (२१) रा. पांढरी असे मृतकाचे नाव आहे. अजय डबले (२२),पीयूष डबले (२०) दोन्ही रा.अंबिकानगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. मृतक युवकाचे गावातील एका युवतीसोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशय आला. ही बाब युवतीच्या आत्या व नातेवाईकांना खटकली. त्यावरून ३० डिसेंबर २०१८ ला आरोपींनी मृतक महेशवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमी युवकाला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी नेर पोलिसांनी सदर आरोपीवर ३२६ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

मात्र उपचारादरम्यान महेशचा २ डिसेंबरला मृत्यू झाला.दुपारी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यावर धडक देऊन रोष व्यक्त केला. जो पर्यंत आरोपींना अटक होणार नाही, तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे स्वीय साहाय्यक राजेश ढोकणे, शिवसेना शहरप्रमुख दीपक आडे यांनी मध्यस्ती केली.

आरोपींना तीन दिवसांत अटक करण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदार अनिल किनगे यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक व गावऱ्यांच्या स्वाधीन मृतदेह करण्यात आला. याप्रकरणी नेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, १२० ब नुसार गुन्हा दाखल केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार अनिल किनगे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी परिस्थिती आटोक्यात आणली.