देशात पहिल्यांदा होणाऱ्या NBA गेममध्ये ‘जन गन मण’ गाणार ‘हा’ Youtuber, मॅच पाहण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात पहिल्यांदाच होणाऱ्या एनबीए बास्केटबॉल गेममध्ये युट्युबर भुवन बाम भारताचं राष्ट्रगीत गाणार आहे. ही संधी मिळाल्याने सन्मान वाटत असलेल्या भुवनने सांगितले, “भारतात पहिल्यांदा एनबीएमध्ये राष्ट्रगीत गाणं माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर आपल्या राष्ट्राची महिमा गाण्यासाठी संधी मिळाल्याने मी खूपच आनंदित झालो आहे.”

भुवन म्हणाला, “याबद्दल नुसता विचार करूनच माझ्या अंगावर शहारा येत आहे. हे खूपच रोमांचक आहे. आजवर कोणत्याही भारतीयांना असे करण्याची संधी मिळालेली नाही अशा ठिकाणी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मला अधिक संधी मिळेल अशी मला आशा आहे. ” एनबीए गेमची सुरुवात आज शुक्रवारी म्हणजे 4 ऑक्टोबर मुंबईत होणार आहे. पहिली मॅच सॅक्रामेंटो किंग्स आणि इंडियाना पेसर्स यांच्यात होणार आहे.

एनबीए इंडियाने 20 डिसेंबर 2018 मध्ये घोषणा केली होती की, “देशात पहिल्या एनबीए गेमचं ऑक्टोबरमध्ये मुंबईत आयोजन केलं जाईल. याआधी अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमादरम्यान खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात येण्याचे संकेत दिले होते. मुंबईत 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी देशात पहिल्यांदा होणारी एनबीए मॅच पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या मॅच रिलायंस फाउंडेशन ज्युनिअर एनबीए प्रोग्राम अंतर्गत खेळवल्या जाणार आहेत.

हाउडी मोदी कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, “लवकरच भारतात एनबीए बास्केटबॉल होणार आहे. पुढील महिन्यात लोक पहिली एनबीए मॅच पाहणार आहेत. पंतप्रधान काय मी ही मॅच पाहण्यासाठी येऊ शकतो? आश्चर्यचकित होऊ नका मी येऊ शकतो.”