पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ, युवा सेनेचा शहराध्यक्ष गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वर्दळीच्या ठिकाणी पार्क केलेली फॉर्च्युनर गाडी बाजूला पार्क करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालणाऱ्या भारतीय युवा सेनेच्या पुणे शहराध्यक्षाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार कात्रज चौकी समोर घडला.

पप्पू ऊर्फ कमलाकर बाबूराव भंडारी (वय २९, रा. शेलार बंगला, पवार हॉस्पिटलजवळ, बालाजीनगर) असे अटक केलेल्या भारतीय युवा सेनेच्या अध्यक्षाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ हनुमंत अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज चौकीसमोर वाहतूककोंडी झाल्याने फिर्यादी यांनी फॉर्च्युनर कारचा चालक संदीप निवंगुणे याच्या बाजूला बसलेल्या भंडारीला गाडी बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्याने ‘माझी गाडी बाजूला लावा सांगणारे तुम्ही कोण ? ही गाडी माझी आहे. मला जिथे वाटेल तिथे मी ती लावेन. मी भारतीय युवा सेनेचा पुणे शहराध्यक्ष आहे. मी गाडी काढणार नाही ; तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे म्हणत फिर्यादी यांच्याबरोबर हुज्जत घातली. हा सर्व प्रकार सुरू असताना निवंगुणे हा कार घेऊन कात्रजच्या दिशेने निघून गेला असून त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी भंडारी याला न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारी पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सरकारच्यावतीने युक्तीवाद केला.