आता युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. शिवसेनेचे युवा नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी शिवसेना युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू देखील आहे

इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये वरूण सरदेसाई यांनी लिहले आहे की , हीच वेळ आहे..हीच संधी आहे..लक्ष्य – विधानसभा २०१९ !!महाराष्ट्र वाट पाहतोय. असे म्हणत त्यांनी स्वतःचा व आदित्य ठाकरे यांचा गळाभेट घेतानाच फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केले आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीने नेत्रदीपक विजय मिळवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी करत आहेत. निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तरुणांच्या समस्या, त्यांचे विचार, त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आदित्य संवाद’ या मोहिमेचे आयोजन केले होते. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई अशा पाच ठिकाणी हे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याला तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

निवडणूक लढण्यासंदर्भात निर्णय आदित्य ठाकरेच घेतील – उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे यांचाच असेल. त्यामुळे जर आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या हाकेला साद देऊन निवडणूक लढवली तर ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात असेल.