झाकीर नाईकच्या पीस TV ला ब्रिटनमध्ये कोटयावधी रूपयांचा दंड, ‘व्देष’ पसरविल्याबद्दल ‘दोषी’

लंडन : वृत्तसंस्था – इस्लामची शिकवण देणारा वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकला दणका बसला आहे. इंग्लंडमधील ‘मीडिया वॉचडॉग ऑफकॉम’ या संस्थेने हा दणका दिली आहे. झाकीरच्या मालकीच्या पीस टीव्ही आणि पीस टीव्ही उर्दू विरोधात मीडिया वॉचडॉगने करवाई केली आहे. पीस टीव्हीला 1 लाख पौंडांचा आणि पीस टीव्ही उर्दूला 2 लाख पौडांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे झाकीरला 3 लाख पौंड म्हणजेच तब्बल 2.75 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. ऑफकॉम ही ब्रिटनमधील प्रसार माध्यमांवर देखरेख ठेवणारी अधिकृत संस्था आहे.

इंग्लंडमधील टीव्ही चॅनलची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील चॅनलने काही नियम आणि संकेतांचे पालन करणे अनिवार्य आहे. या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या चॅनलवर मीडिया वॉचडॉग कारवाई करते. झाकीरच्या मालकीच्या लॉर्ड प्रॉडक्शन लिमिटेड कंपनीच्या पीस टीव्हीला 1 लाख पौडांचा दंड भरावा लागणार आहे. तर क्लब टीव्ही कंपनीच्या पीस टीव्ही उर्दूला 2 लाख पौडांचा दंड भरावा लागणार आहे. या दोन्ही चॅनलच्या ब्रॉकास्टमध्ये ब्रिटनमध्ये हत्यांसाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि द्वेष पसरविण्यास दोषी ठरविले आहे. या चॅनल्सनी प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अक्षेपार्ह कार्यक्रमांचे प्रसारण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ऑफकॉमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑफकॉमने पीस टीव्ही उर्दूवर दोन लाख पौड आणि पीस टीव्हीवर एक लाख पौंडचा दंड ठोठावला आहे. झाकीर नाईक याचे पीस टीव्ही उर्दू आणि पीस टीव्ही आंतरराष्ट्रीय उपग्रह चॅनल आहेत. या चॅनेल्सवर ब्रिटनमध्ये इस्लामिक श्रद्धासंबंधीत धार्मिक कार्यक्रम प्रसारित केले जातात.

ऑफकॉमने म्हटले आहे की, पीस टीव्ही उर्दू आणि पीस टीव्हीवर प्रसारित झालेले कार्यक्रम आक्षेपार्ह आहेत आणि एका ठिकाणी असे दिसून येते की, यामध्ये लोकांना हत्येसाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. आम्हाला आमच्या तपासणीत असे आढळले आहे की, या कार्यक्रमाची सामग्री ब्रिटनच्या प्रसारणाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करीत आहे. त्यासाठी या चॅनेल्सवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज होती.