हुंड्यासारखा खर्च थांबवत नाही तो पर्यंत लेक लाडकी या घरची होणार नाही :ॲड.वर्षा देशपांडे यांचे प्रतिपादन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – एका बाजूला स्त्री – पुरुषांमध्ये समानता दिसत असताना दुस-या बाजुला हुंडा, मालमत्तेत द्यावा लागणारा हिस्सा व सुरक्षितता या कारणाने गर्भातील मुली गायब केल्या जात आहेत. जो पर्यंत समाजातील बुद्धीजीवी लोक लग्नकार्यात हुंड्यासारखा खर्च थांबवत नाही तो पर्यंत लेक लाडकी या घरची होऊ शकत नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी नीरा येथे व्यक्त केले.

नीरा (ता.पुरंदर) येथील झंकार व्याख्यानमालेत ‘लेक लाडकी या घरची ‘ या विषयावर विचार व्यक्त करताना ॲड. वर्षा देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ॲड. अबिदा मुल्ला होत्या. या वेळी  प्रा.व.बा.बोधे,  नाना जोशी,  बाबुशेठ शहा,  बाळासाहेब भोसले, डाह्याभाई पटेल, डॉ. वसंतराव दगडे, बाळासाहेब ननवरे , किरण बोधे  यांच्यासह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.

ॲड. देशपांडे  पुढे म्हणाल्या की, सावित्रीच्या महाराष्ट्रात लेक लाडकी या घरची  शिल्लक आहे का?  खरोखरच  ती लाडकी आहे का  ? याचा शोध घ्यावा अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. हिंगणघाट व औरंगाबाद मध्ये घडलेल्या जळीत कांडाच्या घटना घडल्या मात्र अशा हिंसेसारख्या घटनांं पासून महिलांना मुक्ती हवीय.

राजकारण्यांनी  आज बिनकारणाचे  मुलांच्यापुढे धर्म आणि जातीचा गोंधळ घालून ठेवला आहे.  धर्म आणि जात ठरविण्याचा अधिकार या देशातील महिलांचा आहे. कारण त्या जन्मदात्या आई आहेत.एनआरसी पाहिजे का नाही हे  जन्मदात्या आईला विचारले गेले पाहिजे .पुरुषांनी  एनआरसी या  व्हायरस ला विरोध केला पाहिजे  नाहीतर भविष्यात मुलांना याचा खुप त्रास भोगावा लागणार आहे. यासाठी महिलांनीही पुढे आले पाहिजे.साहित्यिक , कलाकार, सामाजिक कार्यकर्ते,  हेच सामाजिक सांस्कृती व सामाजिक मन घडवत असतात.महिलांकडे जोपर्यंत माणूस म्हणून बघण्याची सवय लागत नाहीत तोपर्यंत महिला सुरक्षित राहणार नाही.

अध्यक्षस्थानावरून ॲड.अबिदा मुल्ला म्हणाल्या कि, मुलींना कमी लेखणे हा विचार बदलला तर समाज सुधारला असे म्हणावे लागेल. घरातूनच  मुलींंवर चांगले संस्कार झाले  पाहिजे.  हुंडाबळी सारखे प्रकार रोखण्यासाठी मुलींना आधार दिला पाहिजे. तसेच पुरुषांनी मनावर संयम ठेऊन  महिलांंना  मानाचे स्थान देणे गरजेचे आहे. भ्रुणहत्या यासारखे घ्रुणास्पद प्रकार थांबले पाहिजे. याकरिता समाजातील घटकांमधील विचारसरणीत  बदल  होणे गरजेेचे आहे.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन नेहा शहा यांनी केले. आभार बाबुशेठ शहा यांनी मानले.