महाराष्ट्र, हरियाणानंतर आता भाजपाच्या पुढं झारखंडचं ‘आव्हान’, विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र, हरियाणानंतर आता झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत. 81 जागांसाठी पार पडणाऱ्या या विधानसभा निवडणूकीसाठी 30 नोव्हेंबरपासून मतदान प्रक्रिया सुरु होईल, तर मतमोजणी 23 डिसेंबरला पार पडेल.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीच्या तारखांची घोषणा केली. यानंतर आता राज्यात आचारसंहिता लागू होईल. ही निवडणूक पाच टप्प्यात पार पडेल.

पहिला टप्पा 30 नोव्हेंबरला – 13 जिल्हे
दुसरा टप्पा 7 डिसेंबरला – 20 जिल्हे
तिसरा टप्पा 12 डिसेंबरला – 17 जिल्हे
चौथा टप्पा 16 डिसेंबरला – 15 जिल्हे
पाचवा टप्पा 20 डिसेंबरला – 16 जिल्हे

मतदान केंद्रांची संख्या 20 टक्के वाढवण्यात आली आहे. झारखंडमध्ये 2.265 कोटी मतदार आहेत.

नक्षलवादी भागात मतदान प्रक्रिया राबवणे आव्हान
झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात मतदान प्रक्रिया राबवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. राज्यात 19 जिल्ह्यात 67 जागा नक्षलग्रस्त आहेत. याशिवाय 19 जिल्हे संवेदनशील आहेत 13 अति संवेदनशील आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की नक्षलग्रस्त भागात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

राज्यात भाजप – आजसूचे सरकार
झारखंडमधील 81 सदस्य असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 ला समाप्त होईल. राज्यात सध्या भाजप – आजसू (ऑल झारखंड स्टूडेंट यूनियन) चे युती असलेले सरकार सत्तेत आहे. रघुवर दास राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणूकीत भाजपने 37 तर आजसूने 5 जागांवर विजय मिळवला होता. महाराष्ट्रात आणि हरियाणात एनडीएला झटका बसल्यानंतर आता भाजपपुढे मोठे आव्हान आहे. झारखंडमधून झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल निवडणूकीच्या मैदानात आहेत.

जादूई आकडा
झारखंड विधानसभेत एकूण 81 जागा आहेत, त्यामुळे बहुमतासाठी 41 आकडा पार करणे आवश्यक आहे. मागील निवडणूकीत काँग्रेसला 6, झारखंड मुक्ती मोर्चला 19, झाविमोला 8 तर अपक्ष 6 अशा जागा मिळाल्या होत्या.

Visit : policenama.com