‘या’ आमदाराचा सलमानला पाठिंबा, म्हणाला – ‘भाईजाननं कधीही कोणालाही त्रास दिला नाही’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टीका होत आहे. या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी पुढे सरसावले आहेत. सलमान एक दिलदार व्यक्ती आहे, त्याच्यावर असे आरोप करु नका. अशी विनंती त्यांनी केली आहे.

सिद्धिकी यांनी सलमानचे कौतुक करण्यासाठी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 2014चा एक किस्सा सांगितला आहे. कोणालाही न कळता मदत कशी करायची? हे त्यावेळी सलमानने त्यांना शिकवले होते. असा दिलदार माणूस कोणाचे वाईट कसे काय करु शकतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सिद्धिकी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ कामगारांची संघटना देखील सलमानच्या मदतीसाठी पुढे सरसावली होती. सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे त्यांनी म्हटले होते.
त्याच्या विरोधात सुरु असलेल्या ऑनलाईन पिटिशनवर आतापर्यंत 34 लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. तसेच गेल्या काही तासांत त्याचे 55 हजार सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरुनच सलमान विरुद्ध पेटलेला संताप आणखी वाढत असल्याचे दिसून आले आहे.